प्राथमिक विभाग

योगी श्री अरविंद गुरुकुल    07-Jun-2015कृतीप्रधान शिक्षण:

प्राथमिक विभागात मुलांना प्रथम श्रवण, संभाषण आणि सर्वात शेवटी लेखन या क्रमाने हया चार कौशल्यावर भर देतात. विद्यार्थ्यांनी खूप लिहावे हा हटट् न धरता त्यांच्या बोटांच्या आणि हातांच्या स्नायूंचा विकास होण्यासाठीचे उपक्रम आखले जातात. या कृतीप्रधान शिक्षणात गटामध्ये आपल्या मित्रांकडून शिकणे, वर्गामध्ये एखादा घटक मुलांनी शिकविणे, स्वयं-अध्ययन इ. विविध तंत्रांचा वापर प्राथमिक विभागात केला जातो.

मातृभूमी परिचय शिबिर:

दरवर्षी प्राथमिक विभागातील इ. 1ली, 2रीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 दिवसाचे, इ. 3री, 4थीचे 4 दिवसांचे निवासी शिबिर आयोजित केले जाते. निसर्गाच्या सान्निध्यात मुले मुक्तपणे राहतात. गटात राहून गड-किल्ल्यांचा अभ्यास करतात, ट्रेकिंगचा अनुभव घेतात.

आनंद बाजारः

पूर्व प्राथमिक विभागातील मुले त्यांनी स्वतः तयार केलेल्या छोटया छोटया वस्तू आनंद बाजारात विकतात किंवा विकत घेतात. त्यांचे पालक खरेदीसाठी येतात. मुले खरेदीचा आनंद घेतात आणि विक्रीचे तंत्र आणि गणिती कौशल्य आत्मसात करतात. इ. 1ली ते 4थीची मुले आनंद बाजारासाठी वर्षभर तयारी करत असतात. दरवर्षी हस्तकला, विज्ञान प्रयोग आणि सूक्ष्मकारक स्नायूंच्या विकासासाठीच्या उपक्रमार्तंगत विविध वस्तू मुले तयार करतात आणि त्या मोठया विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना विकतात. जीवन व्यवहारामध्ये शिकलेले खाद्यपदार्थसुध्दा ते विकतात. ते सर्व व्यवहार त्यांच्या चलनामध्ये करतात. त्यांचे चलन तयार करुन चलन हस्तातंरण खिडकीही चालवितात.

अभ्यास जत्रा:

अभ्यास जत्रा म्हणजे वर्गात अभ्यास आणि वर्गाच्या बाहेर आणि शाळेच्या आवारात ‘जत्रा’. वर्गात मुलांनी आपल्या परीक्षेला नेमलेला अभ्यास विषय जत्रेला आलेल्या पालकांना समजावून सांगण्याच्या प्रयत्नातून आपली परिक्षेची तयारी करायची हा मुख्य भाग आणि पालकांनी, माजी विद्यार्थ्यांनी आणि परिसरातील शाळांनी जत्रेप्रमाणे विविध शैक्षणिक आकर्षण मांडून शाळेत आनंददायक वातावरण निर्माण करायचे हा दुसरा भाग. अभ्यासजत्रेमुळे परिक्षेची भीती दूर होते, विषय घटक पक्का होतो, नैसर्गिक प्रवृत्ती जागृत होते, आत्मविश्वास निर्माण होतो, सभाधीटपणा येतो आणि भाषाकौशल्य विकसित होते.

अन्य उपक्रम:

आपल्या चालीरिती आणि परंपरा यांची मुलांना ओळख व्हावी म्हणून दरवर्षी इ. 1ली ते 4थीमध्ये आषाढ़ी एकादशीनिमित्त दिंडी, दीप अमावस्या, नागपंचमी, निसर्गपूजा, राखीपौर्णिमा, मंगळागौर, बैलपोळा, मातृदिन, भोंडला असे परंपरा आणि संस्कार रुजविणारे विविध सण साजरे करतो. हे चिमुकले विद्यार्थी या सर्व सणांचा आणि वर्षासहलीचाही मनमुराद आनंद घेतात.