पूर्व प्राथमिक विभाग

योगी श्री अरविंद गुरुकुल    07-Jun-2015

बालकेंद्री शिक्षण :

नवीन नवीन शिकायला बालक उत्सुक असते. नित्य नवे अनुभव या कालखंडात संवेदना ग्रहण करण्याची शक्ती हे अधिक तीव्र करतात. टीपकागदासारखी त्यांच्या मनाची अवस्था असते. माणसाच्या आयुष्याची इमारत सुडौल, सुबक, मजबूत, टिकाऊ आणि दुसऱ्यांना आधार, निवारा देणारी होण्यासाठी पहिल्या सहा वर्षाचा पाया भरभक्कम हवा.

पूर्व प्राथमिक विभागात मुलांनी अनुभवांतून शिकण्यावर भर दिला जातो. मुलांनी लिहिण्याऐवजी त्यांना भाषिक, तार्किक, गणिती, विज्ञान, पर्यावरण इ. विषयक अनुभव दिले जातात. त्यातून मुले आपली आपणच शिकत असतात. ते विविध ठिकाणांना भेटी देतात. बैल, कीडे, पक्षी, फुलपाखरे अशा प्राण्यांनासुध्दा भेटतात. पोस्टमन, पेपरवाला, गॅसवाला, कुंभार, कासार, लोहार अशा व्यावसायिकांचा परिचय करुन घेतात.

मातृभूमी परिचय शिबिर :

दरवर्षी पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थी शिबिरात एक रात्र मुक्काम करतात. घरापासून आणि आईवडिलांपासून दूर राहण्याचा अनुभव मुले घेतात. शिस्त आणि स्वावलंबनातून त्यांचा सामाजिक विकास साधला जातो. गटातून मुक्तपणे राहण्याचा अनुभव मुलांना मिळतो.

अन्य उपक्रम :

आपल्या चालीरिती आणि परंपरा यांची मुलांना ओळख व्हावी म्हणून दरवर्षी आषाढ़ी एकादशीनिमित्त दिंडी, दीप अमावस्या, नागपंचमी, निसर्गपूजा, राखीपौर्णिमा, मंगळागौर, बैलपोळा, मातृदिन, भोंडला असे विविध सण साजरे करतो. हे चिमुकले विद्यार्थी या सर्व सणांचा आणि वर्षासहलीचाही मनमुराद आनंद घेतात.