छंदवर्ग

योगी श्री अरविंद गुरुकुल    07-Jun-2015

छंदवर्ग संगीत विभाग

सूर-ताल आणि लय यांची गुंफण असणाऱ्या ‘संगीताचे’ माणसाच्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. संगीत म्हणजे ‘आनंद’! गुरुकुलातील संगीत शिक्षण हे खऱ्या अर्थाने सुसंस्कारित पिढी घडविणारे आणि कलाकार घडविणारे शिक्षण आहे. दुपारच्या सत्रात मुले शास्त्रीय गायन, तबला, संवादिनी आणि शास्त्रीय नृत्य शिकतात. योगी श्री अरविंद गुरुकुलाच्या काही माजी विद्यार्थ्यांनी या छंदवर्गातूनच आपले व्यवसाय-करिअर निवडले आहे.

अ. भा. गांधर्व महाविद्यालय परीक्षा केंद्रः

योगी श्री अरविंद गुरुकुल (छंदवर्ग) हे सन 2006 पासून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे तीन परीक्षापर्यंतचे केंद्र आहे. विद्यार्थी शास्त्रीय गायन, तबला, संवादिनी आणि शास्त्रीय नृत्य यांच्या परीक्षा देतात आणि यशस्वीपणे उत्तीर्ण होतात. या परीक्षांचा अभ्यासक्रम आणि छंदाचा सराव यांचा मेळ साधला जातो.

गुरुपौर्णिमाः

व्यासपौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. यादिवशी विद्यार्थी शिक्षकांबदद्ल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतात. विद्यार्थी गायन, हार्मोनिअम, तबला, नृत्य यांतील कौशल्य सादर करतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुकुलाचे माजी विद्यार्थी शाळेत येऊन शिक्षकांबदद्ल आदर व्यक्त करतात.

दिवाळी पहाटः

दरवर्षी नरक चतुर्थीच्या दिवशी दिवाळी पहाट साजरी केली जाते. दरवर्षी एका ठराविक संकल्पनेवर ‘दिवाळी पहाट’ हा कार्यक्रम सादर केला जातो. विद्यार्थी छोटया नाटिका, गाणी, नृत्य सादर करतात. या सर्व सादरीकरणात कोणत्याही गाण्याची सीडी न लावता मुले स्वतः गाणी म्हणतात.

वर्षांन्त

वार्षिक परीक्षेनंतर इ.1ली ते 10 वी च्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जातो. हा कार्यक्रम ठराविक संकल्पनेवर सादर केला जातो. यात विद्यार्थी नाटक, गाणी, नृत्य, सूर्यनमस्कार, योगासने इ. सादर करतात. या सादरीकरणात ‘वाद्यवृंद’ विद्यार्थ्यांचा स्वतःचा असतो.